फडके श्री गणपती मंदिरातर्फे सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत .अधीक माहितीसाठी येथे क्लिक करा ...

आमचे उपक्रम

शिष्यवृत्ती वाटप

 

ट्रस्टतर्फे गेली सुमारे ५० वर्षे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप केले जाते. दरवर्षी अंदाजे २००० विद्यार्थ्यांना हे वाटप केले जाते .

मुंबई बाहेरील सुमारे ५०० विद्यार्थ्यांसाठी ट्रस्टचे विश्वस्त स्वत: जाऊन ही शिष्यवृत्ती देतात.

वेदांचे अध्ययन करणाऱ्या वेद्पाठ शाळेतील मुलांनाही शिष्यवृत्ती देवून गौरवण्यात येते.

phadke ganpati shish1
phadke ganpati shish2

संस्थेच्या उद्दिष्टानप्रमाणे शिक्षण , धार्मिक, वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना आर्थिक मदत करण्यात येते.

वर्षभरात सुमारे ३५-४० संस्थांना ही मदत देण्यात येते

परदेशात शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना भरघोस आर्थिक मदत केली जाते.

गेल्या ५ वर्षात २५-३० विद्यार्थ्यांना अशी मदत करण्यात येत आहे.
 

find out more

फडके मंदिराचा इतिहास

स्वस्ति श्रीगणनायकम् गजमुखम् मोरेश्वरम् सिद्धिदम्।

बल्लाळम् मुरुडम् विनायकमढम् चिंतामणिम् थेवरम्।।

लेण्याद्रिम् गिरिजात्मकम् सुवरदम् विघ्नेश्वरम् ओझरम्।

ग्रामे रांजण संस्थितो गणपतिः कुर्यात् सदा मंगलम्।।

ही प्रार्थना म्हणून अष्टविनायकांचे सतत स्मरण केले जाते.

श्रीगणेश ह्या आराध्य दैवताबद्दल हिंदूंच्या मनात नितांत आदर आहे. देवगणांत श्रीगणेशाचे महत्त्व असेच परिपूर्ण आहे. मनःकामना पूर्ण करणाऱया ह्या देवावर भक्तांची अढळ श्रद्धा असते. मुंबापुरीत गणेशभक्तांची दोन प्रमुख श्रद्धास्थाने आहेत. प्रभादेवीचे सिद्धिविनायक मंदिर व गिरगावातील फडके श्रीगणपति मंदिर. इतिहास घडविणारे मंदिर म्हणून फडके श्रीगणपति मंदिराकडे अंगुलिनिर्देश करावा लागेल.

सन 1865 मध्ये अलिबाग (रायगड) जिल्हय़ातील आवास गावचे श्री गोविंद गंगाधर फडके हे मुंबईत राहण्यास आले. त्यांनी हायकोर्टात नोकरी धरली. ते स्नानसंध्या, देवपूजा व इतर धार्मिक कर्मे मोठय़ा निष्ठेने करीत असत. सन 1867 साली विठ्ठलभाई पटेल रोडवरील वृक्षराजीने नटलेली निसर्गसुंदर जागा त्यांनी विकत घेतली. श्री. गोविंदरावांच्या पत्नी सौ. यशोदाबाई ह्यासुद्धा धार्मिक वृत्तीच्या होत्या.

‘नित्य देवपूजा नित्य दानधर्म, जाणावे हे मर्म जीवनाचे’ हे जाणणाऱया त्या होत्या. त्यांच्या जीवनात एक उणीव प्रामुख्याने जाणवे. त्यांना संतती नव्हती. एखादा सुपुत्र जन्माला येऊन वंशाचा दिवा प्रज्वलित रहावा असे त्यांना नेहमी वाटे, पण श्री. गोविंदरावांच्या अकाली निधनाने त्यांचे स्वप्न् धुळीला मिळाले. पुत्रप्राप्तीची त्यांची इच्छा अपुरी राहिली. दत्तविधान कल्पना त्यांना मान्य झाली नाही. आपली धनदौलत मानवाला देण्यापेक्षा देवासाठी तिचा सदुपयोग व्हावा अशी त्यांना प्रबळ इच्छा झाली. ह्या इच्छेनुसार यशोदाबाईंनी ‘गजानन चिरंजीव जहाला’ ह्या भावनेने गणपति देवालय बांधण्याचा संकल्प सोडला.

श्री. गोविंदरावांनी विकत घेतलेल्या जागेत सौ. यशोदाबाईंनी मोठा बागबगीचा तयार केलेलाच होता. त्यात मोगरा, कर्दळी, जास्वंद, तगर, मधुगंध, सोनचाफा, मदनबाण व सदाफुली अशी फुलझाडे होती. फुलझाडांच्याबरोबर पपनस, पेरू, रामफळ व सिताफळ ही झाडे, तसेच नारळ, पोफळी व माडाची झाडे तर बागेच्या सौंदर्यात भर घालीत असत. बागेत पाण्याची एक विहीरही होती. त्या बागेला त्यांनी ‘गोविंदबाग’ व त्या परिसराला ‘फडकेवाडी’ अशी नावे दिली.

सौ. यशोदाबाईंच्या संकल्पानुसार गणेशमंदिर बांधण्यास सुरुवात झाली व सन 1890 चे सुमारास मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. त्या वेळच्या रिवाजाप्रमाणे गाभारा काळवत्री दगडाचा व बाहेरचे काम सफेद फरशीचे करण्यात आले. सुमारे सतरा हजार रुपये खर्च करून बडोद्याहून एका जयपूरनिवासी कारागिराकडून गणरायाची मूर्ति आणण्यात आली होती. सनईच्या मंगल सुरात, ब्रह्मवृंदाच्या वेदमंत्राच्या जयघोषात व चौघडय़ाच्या ठेक्यात ‘मंगलमूर्ती मोरया’ मंदिरात स्थानापन्न झाला. पूजेसाठी वेदमूर्ति विनायकशास्त्री पटवर्धनांची नेमणूक झाली.

यशोदाबाई गणेशाची सेवा करू लागल्या परंतु त्या वृद्धत्वाकडे झुकू लागल्या होत्या. कालचक्राप्रमाणे एक दिवस यशोदाबाईंना निजधामाचे बोलावणे आले व श्रीगजाननाचे नामस्मरण करीत त्यांनी इहलोक सोडला. मृत्यूपूर्वी गणेश मंदिराची व्यवस्था त्यांनी करून ठेवली होती. श्री. बाळाजी पांडुरंग भालेराव हे फडके घराण्याचे स्नेही होते. त्यांच्या सल्ल्याने गणेश मंदिराच्या उत्पन्नासाठी त्यांनी विश्वस्त समिती नेमली.

श्री. बाळाजी पांडुरंग भालेराव हे विश्वस्त प्रमुख होते. व धरमसी मोरारजी, शामराव पांडुरंग, श्री. धो. त्रिं. आपटे व श्री. वि. वि. बापट हे पहिल्या विश्वस्त समितीत होते. ह्या विश्वस्त समितीच्या देखरेखीखाली मंदिराचा कारभार चालू झाला. यशोदाबाईंचा वंशाचा दिवा नव्हता तरी गणपती मंदिराच्या विश्वस्त समितीने त्यांच्या पुण्यस्मरणाची व्यवस्था उत्तम रीतीने केली आहे. श्री. गोविंदराव व श्रीमती यशोदाबाई ह्यांच्या श्राद्ध व पक्ष या तिथ्यांचे कार्यक्रम प्रतिवर्षी केले जातात. विश्वस्तसमितीचे हे कार्य अभिनंदनीय खासच आहे.

कालप्रवाहानुसार फडके गणपति मंदिरात बदल घडत गेला. सन 1918 मध्ये श्री. धरमसी मोरारजी खटाव ह्यांनी मंदिरात वीज आणली. श्री. माधवराव मराठे, श्री. मो. कृ. गोडबोले ह्या विश्वस्तांच्या कारकीर्दीत मंदिरात कथा व प्रवचन सुरू झाले. श्री. कारुळकर हे नवे पुजारी आले. मूर्तीवर शेला व पीतांबर आला. सन 1923 पासून मंदिरात चित्रकला, रांगोळी ह्यांची नैमित्तिक प्रदर्शने भरू लागली. मंदिरात भक्तांची रीघ वाढू लागली व पर्यायाने मंदिराचा खर्च वाढला. श्री. गजाननराव लिमये ह्यांनी मंदिराच्या मोकळय़ा जागेत चाळ बांधून मंदिराचे उत्पन्न वाढविले. पुण्याचे कॉट्रक्टर श्री. लक्ष्मणराव फाटक व उद्योगपति श्री. तात्यासाहेब आपटे ह्यांचे सहकार्य मंदिराच्या उत्कर्षाला कारणीभूत झाले.

सन 1936 साली श्री. नानासाहेब गोगटे, डॉ. अ. ना. भालेराव व श्री. सुंदरराव आठवले ह्यांची विश्वस्त समितीवर नेमणूक झाली. त्यांनी मंदिराचे उत्पन्न वाढवून ट्रस्टला झालेल्या कर्जातून ट्रस्ट मुक्त केला. ह्याच काळात वेदमूर्ती दिनकरशास्त्री बापट व श्री. काळे मंदिराचे पुजारी होते. विश्वस्त समितीत श्री. रघुनाथराव आपटे, श्री. भाऊसाहेब आपटे, श्री. दाजी भाटवडेकर व श्री. दि. प. दांडेकर ह्या उत्साही मंडळींची नेमणूक झाली. त्यांनी मंदिराच्या आवारात रस्त्यालगतच छोटय़ा दुकानांसाठी जागा भाडय़ाने देऊन उत्पन्नात भर घातली. मंदिराच्या पुढच्या बाजूस दरवाज्यावर मंदिरातील गणरायाची फ्लास्टरची प्रतिकृती बनवून भक्तगणांना चोवीस तास दर्शनाचा लाभ मिळावा अशी व्यवस्था केली. पुढे श्री. वासुदेव रामचंद्र पटवर्धन ह्यांची व्यवस्थापक म्हणून व श्री. तात्या मालशे ह्यांची पुजारी म्हणून नेमणूक केली गेली.

कार्यकारी विश्वस्तांनी श्रीमंदिराच्या आवारात ‘यशोमंगल’ नावाची नवी इमारत सन 1959-1960 साली बांधली. विवाह, यज्ञयाग प्रासंगिक धार्मिक कार्ये, सभा-संमेलने इत्यादींसाठी या इमारतीचा उपयोग केला जातो. दर वर्षी सुमारे रुपये 25 हजार भाडे यातून मिळते. प्रतिवर्षी रुपये 15 हजारापर्यंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या वाटल्या जातात. मंदिराच्या मालकीची एक सुसज्ज अशी धर्मशाळा कनकेश्वर क्षेत्री आहे. ‘यशोमंदिर’ मधील यज्ञमंडपात प्रतिवर्षी आंग्रेवाडी (काळबादेवी) समस्त ब्रह्मवृंदमंडळातर्फे विष्णुयाग, गणेशयाग, शतचंडी व महारुद्र स्वाहाकाराचा कार्यक्रम केला जातो.

फडके गणपतिमंदिर उत्तराभिमुखी आहे. बाहेरून मंदिर काहीसे चौकोनी दिसते. मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरताच देवळाचा मुख्य भव्य सभामंडप लागतो. या सभामंडपात 200 माणसे बसू शकतात. सभामंडपात देवदेवतांच्या तसबिरी व हंडय़ा-झुंबरे लावलेली आहेत. प्रदक्षिणेच्या वाटेवर मुख्य देवाच्या पाठीमागे गणपतीची एक काचेची मूर्ती बसविण्यात आली आहे. मंदिराचा गाभारा आठ फूट लांब व दहा फूट रुंद आहे. गणपतीची मूर्ती कमळावर मांडी घालून बसलेल्या थाटात आहे. मूर्तीचे कान विस्फारलेले आहेत. सोंड डावीकडे झुकलेली आहे. मूर्तीवर मुकुट रोज चढविला जातो. प्रत्यक्ष गाभाऱयात गणेशपंचायतन आहे. त्यात श्रीमहालक्ष्मी, श्रीविष्णु, श्रीगणपति, श्रीशंकर व श्रीसूर्यनारायण आहेत. मूर्तीच्या उभय बाजूस रिद्धिसिद्धि उभ्या ठाकलेल्या आहेत व त्यांच्या पुढे शिसवीचे हत्ती आहेत. मूर्तीसभोवतालचे मखर चांदीच्या पत्र्याने मढविलेले आहे. मूर्तीवर उत्सवकाळात सुंदरशी छत्री फिरत असते. देवाच्या पायाशी गणपतीच्याच तसबिरी मांडून ठेवलेल्या आहेत. श्रीमूर्तीच्या चौरंगाच्या भोवती फुलांची आरास केलेली असते

गाभाऱयाच्या बाहेरील बाजूस उजवीकडे एक व डावीकडे एक असे दोन कोनाडे आहेत. एका कोनाडय़ात त्रिमूर्ती दत्तराजा व दुसऱयात कुंजविहारी कृष्ण यांच्या मूर्ती आहेत. गाभाऱयाचा चांदीने मढविलेला दरवाजा, श्रीगणेशमूर्तीचे चांदीचे मखर व सुशोभित बसलेली श्रीमूर्ती बघून भाविकांच्या डोळय़ांचे पारणे फिटते. चांदीचा दरवाजा असलेले महाराष्ट्रातले हे एकमेव देऊळ आहे, ही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. दरवाजावर राष्ट्रीय पक्षी मयूर, वनराज सिंह, भव्य गजराज व पावित्र्यनिदर्शक स्वस्तिक चिन्ह छानदार नक्षीकामामध्ये कोरलेले असल्याने मंदिराची शोभा आणखीन वाढली आहे. भक्तांना शुभाशीर्वाद देणाऱया श्रीगणेश मूर्तीला बघून भाविक कृतकृत्य होतात आणि अत्यादराने वंदन करतात.

(फडके कुलवृत्तान्तातून उद्धृत)